पैशातून सर्व समस्या सुटतात हा चुकीचा गैरसमज   

मुकुंद फडके यांचे प्रतिपादन 

पुणे : विवाह समस्या ही समृद्धीतून निर्माण झालेली गोष्ट आहे. पैसा मिळविला की समस्या सुटतात असा बहुतेकांचा समज आहे. मात्र, समृध्दीनंतर अपेक्षा वाढतात. त्यातून समस्याही निर्माण होतात. खरे तर विवाह हा संस्कार सोहळा आहे. मात्र, त्यासही अलीकडे ‘इव्हेंट’चे रूप आले आहे. त्यामुळे विवाह जमवायचे असेल किंवा झालेले विवाह टिकवायचे असेल, तर लग्नासह त्यासोबत येणार्‍या कोणत्याही गोष्टींचा इव्हेंट करू नका. असा सल्ला ज्येष्ठ समुपदेशक व पत्रकार मुकुंद फडके यांनी उपस्थितांना दिला. 
 
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ज्ञानसत्रात ‘विवाह समुपदेशन आजची गरज’ या विषयावर मुकुंद फडके यांनी शुक्रवारी व्याख्यानमालेचे पाचवेे पुष्प गुंफले. कोणतेही गोष्ट नाकारण्यासाठी एक कारण पुरेसे आहे. मात्र, जिथे समस्या तिथे उपायही असतात. त्यातून मार्ग काढण्याची तयारी वधू-वरासह दोघांच्याही पालकांची असली पाहिजे. सल्ले देणारे खूप असतात. मात्र, नाते टिकविण्यासाठी समुपदेशनच महत्त्वाचे ठरते, असेही फडके यांनी नमूद केले. 
 
फडके म्हणाले, विवाह पूर्वी, विवाह ठरल्यानंतर आणि विवाह झाल्यानंतर ते दीर्घकाळ टिकविण्यासाठी या तीन टप्प्यावर समुपदेशन खुप महत्त्वाचे असते. वेळेत विवाह न झालेल्या तरूण किंवा तरूणीत निराशा येते. नंतर न्युनगंड तयार होतो. अशा स्थितीत समुपदेशन होणे नितांत गरजेचे असते. समुपदेशनातून समोरच्यांची मानसिकता तयार केली जाते. मात्र, आपल्याकडे दुदैवाने समुपदेशनापेक्षा सल्लेच अधिक दिले जातात. विवाहाचा निर्णय घेतांना तरूण-तरूणींना समुपदेशनाची गरज असते. तसेच विवाह झाल्यानंतर मुलांच्या आणि मुलीच्या संसारात आई-वडिलांनी किती हस्तक्षेप करावा, याबाबतही समुपदेशन आवश्यक आहे. नात्यातील गुंतागुंत हे पती-पत्नी वेगळे होण्याचे महत्त्वाचे कारण असल्याचेही फडके यांनी सांगितले. 
 
विवाह करण्याची मानसिक तयारी झालेल्या तरूण आणि तरूणींनी आधी विवाहाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. पगार, वय, नाते या तीन कारणांमुळे पती-पत्नीत वाद निर्माण होतात. त्यामुळे समुपदेशातून दोघांच्याही मनातील जळमटे दूर करता येतात. नातेवाईक गावाकडे राहतात म्हणून मुलींना शहरातील मुलगा पती म्हणून हवा आहे. कोणत्याही गोष्टीची तुलना केली की त्यापाठोपाठ द्वेष आणि दु:ख येते. विवाहनंतर लैगिंक समुपदेशही आवश्यक असते. असेही मुकुंद फडके यांनी सांगितले. सुत्रसंचालन अमोद केळकर यांनी केले. 

Related Articles